Monday, 7 March 2011

"जरी प्राणाहुनी प्रिय अशी देशाची माती ....

"जननी जन्मभूमी स्वर्गादपि गरीयसी", अशा शब्दात स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकर यांनी माता व मातृभूमीची महती वर्णिलेली आहे.जन्मदात्री माता व ज्या भूमीवर जन्माला आलो ती जन्मभूमी स्वर्गाहुनी श्रेष्ठ आहे...म्हणूनच भल्या पाहते निद्रेतून जागे झाल्यावर आम्ही 'वंदे मातरम' म्हणतो.ज्या मातेमुळे आम्हाला हे जग दिसले व ज्या मातृभूमीवर आम्ही जगतोय अशा उभयंता पुढे जगातली सर्व सुखे ..अगदी स्वर्ग देखील आम्हाला त्याज्य आहे. अशी उदात्त व विशाल राष्ट्र भावना आमच्या नसानसातून पिढ्यानुपिढ्या पासून अधिवास करीत आलेली आहे.
प्रखर अशा राष्ट्र्भावनेतूनच राष्ट्रवादाची निर्मिती होते व त्यातूनच राष्ट्रभक्तीची ओढ मनामनाला लागते. भारतासारख्या राष्ट्राला हीच परंपरा लाभली असल्याने भारत जगातला 'महान' देश आहे.
 कदाचित मातृभूमीवर एवढे प्रेम करणारा, मातृभूमीला मातेची उपमा देऊन प्रतिदिन 'वंदे मातरम' करणारा 'भारत' हा विश्वात एकमेव देश असेल.ज्या देशातली राष्ट्र भावना प्रबळ आहे, जेथे नागरिक हे निस्वार्थी व उदारमतवादी देशभक्त असतात अशा देशाला उज्वल भवितव्य असतेच. एका आंग्ल विचारवंताने   म्हटले आहे कि, "एखाद्या देशातले तरुण मन कोणत्या पकारचा विचार करते--त्याच्या आवडी-निवडी -काळ-दृष्टीकोन काय आहे यावरच त्या देशाचे भवितव्य अवलंबून असेल.भारतीय तरुणाई हि राष्ट्रभक्ती ने प्रेरित आहे यात तिळमात्र शंका नाही. अगदी आर्य काळापासून मध्ययुगीन काळापर्यंत .......स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळातही युवमान हे नेहमीच देशभक्ती ने भारावलेले होते.....आहे व राहील. मातृभूमीसाठी तन-मन-धन अर्पण करणारी हि तरुणाई जणू गात असते....
"हो जो तैय्यार साथियो....
हो जो तय्यार....
अर्पित कर दो तन-मन-धन .....
मंग राहा है, बलिदान वतन...
अगर देश के काम न आये;
तो जीवन बेकार;
हो जो तय्यार साथियो हो जो तैय्यार....!
राष्ट्रासाठी हि तरुणाई नेहमीच समिधा म्हणून बलिदान करायला सदैव तयार असते याचा प्रत्यय वेळोवेळी आलेला आहेच व पुढेहि तो येईलच.!
कारण 'पूर्व दिव्या भव्य ज्यांचे रम्य त्यांना भाविकाल' या उक्तीनुसार ज्यांचा इतिहास हाच वैभवाने नटलेला असल्याने त्यांचा भाविकाल हि रम्य-अगम्य असेल असे म्हणावेसे वाटते.
पण ; ह्या तरुणांनी बलिदान करावे.....कोणासाठी? राष्ट्रासाठी...! मग राष्ट्र कोणी चालवावे? देश्बाक्तानी---बलिदान करणार्यांच्या वारसांनी कि  भ्रष्ट गटारगंगेत आकंठ बुडालेल्या षंढ जर्जरांनी?
हा खरा प्रश्न आमच्या राष्ट्र-कल्याण वादी मनाला सलतो आहे. त्या बलिदानाचे -असीम त्यागाचे चीज होण्यासाठी सत्तेवर हि राष्ट्रभक्त असणे गरजेचे आहे. नाहीतर ''तुम लढो हम कुर्सी संभालते है.!" कमिशन प्राप्त करणारी.....मृतकाच्या टाळूवरचे लोणी खाणारी मंडळीने या देशाचा कारभार पहायचा? 
एकीकडे या राष्ट्रासाठी भगिनी आपला 'कुंकू' देताहेत......म्हातारे आई-वडील आपला म्हातारपणाचा आधार देताहेत....आणि त्याच राष्ट्राची संपत्ती लुटणारे आधुनिक पेंढारी निपजताहेत..... तर अशा राष्ट्राला रम्य तो भाविकाल कसा असेल हि चिंता आमच्या राष्ट्र कल्याणवादी मनाला सलते आहे....बोचते आहे.
देशभक्तांनी आवेशात 'खून भी देंगे....जन भी देंगे; देश कि मिट्टी कभी नाही देंगे...!' असे म्हणायचे ...आवेशात शत्रूशी दोन हाथ करायचे ...प्रसंगी धारातीर्थी पडायचे...व त्यांच्या बलिदानाने सिंचित या भूवर संधीसाधुनी राज्य करायचे....?
ज्या रयत साठी त्यांनी आपला जीव गमावला त्याच रयतेच्या ताटातील घास पळवणारी कृतघ्न-भ्रष्ट-नतद्रष्ट अवलाद या देशात पाहायला मिळत आहे ....विविध ढोंगी बुरखे परिधान करून मदमस्त चारत आहे.....हे चित्र पाहून 'हे ची फळ काय मम तपाला...? असे म्हणून स्वर्गातील शहीद आपले उर बडवून घेत असतील...!
महाभारतात एक खूपच द्रष्टा संवाद आढळतो...पांडवांच्या विजनवासातील  हा प्रसंग.....! आपले चार हि बंधू एका अज्ञात शक्ती ने पछाडून एका तळ्याकाठी निपचित पडलेले पाहून दु:खी झालेल्या युधिष्ठिरास तो अज्ञात यक्ष काही बौद्धिक प्रश्न विचारतो...त्यातील हा एक प्रश्न...
"यक्ष: कि दृश्य राष्ट्र मृत भवती?
युधिष्ठीर: अराजक राष्ट्र मृत भवती...!"
म्हणजेच यक्ष त्या युधिष्ठिरास विचारतो कि राष्ट्र हे मृत केव्हा होते त्यावेळेस 'अराजकता' असेल तर राष्ट्र मृत होते...नष्ट होते अशा शब्दात युधिष्ठिराने प्रत्युत्तर दिले.
सध्या देशात दृश्य जरी नसली तरी अदृश्य स्वरुपात ....विधायक जरी नसली तरी विघातक स्वरुपात हि अराजकता या देशात आपली पाळे-मुळे घट्ट करीत आहे.
भ्रष्टाचार .....आतंकवाद...दहशतवाद...नक्षलवाद....सत्तालोळूपता...काळाबाजार,गुंडगिरी,भेसळ,राजकारणातील दबंगगिरी ,हफ्तेखोरी आदी लक्षणे हि अराजकतेची असून सर्वच क्षेत्रात त्याची जीवघेणी लागण झालेली आहे. म्हणूनच इजिप्त सारखी क्रांती याही देशात पुन्हा एकदा अपेक्षित आहे.
असे चित्र असल्यावर जि तरुणाई या देशासाठी आपले रक्त सांडण्यास मागे-पुढे पाहत नाही ती कोणती प्रेरणा घेईल?  मग मरावे तरी कोणासाठी? कशासाठी? हा हि एक मोठा सवाल आहे.
जो-तो फक्त आपले इप्सित सध्या करण्यासाठी मश्गुल असल्याने या राष्ट्राची कदर करणारे आहे तरी कोण? या युवापिढीने आदर्श तरी कोणाचा घ्यावा?
म्हणूनच म्हणावे लागते............"जरी  प्राणाहुनी प्रिय अशी देशाची माती ....
तरी मरावे अखेर कोणासाठी...?" 
-------जयपाल सिंह विक्रमसिंह गिरासे
 ९४२२७८८७४०
शिरपूर, जि.धुळे [महाराष्ट्र]

Sunday, 6 March 2011

कुत्र्याला गती आणि माणसाला प्रगती सहन होत नाही......!

जेव्हा जेव्हा समस्त  पृथ्वी  वर  काही  महापुरुष  जन्माला  आले ....त्यांनी  आपल्या  तेजस्वी  कटाक्षाने  या  मानव  समाजातले  दोष / उणीवा  पहिल्या  अन  या  वाट  चुकणाऱ्या  समाजाला , डोळे  असून  अंधत्व  आलेल्या  या  मानव  समूहाला  वेळोवेळी  उपदेश  करण्याचा  प्रयत्न  केला  तेव्हा  त्या -त्या  मानव  समूहाने  किंवा  समाजाने  त्या  महापुरुषांच्या  विचारांचा  स्वीकार  न  करता  चक्क  तिरस्कार  केला आहे.
काही वेळा या समूहाने क्रौर्याची सीमा ओलांडून उपदेश करणाऱ्या महापुरुष व्यक्तींना यमसदनी हि रवाना केलेले आहे.
जिवंत असे पर्यंत त्यांचे कोणी ऐकायला तयार होत नाही ....हा इहलोक सोडून गेल्यावर मात्र समाजाला जाग येते...इतिहास आणि समाज शास्र चे संशोधक त्या महापुरुषांच्या जीवनावर संशोधन करतात.....चरित्रे लिहितात....काही दानशूर मंडळी पुतळे उभारतात....स्मारके बांधतात.....आणि या धावपळीत त्यांचे मूळ विचार हि विसरतात..!
म्हणजे या मानव समाजाची अशी धारणा आहे कि, " कोणीही असामान्य व्यक्ती....जो त्यांच्यापेक्षा वेगळा आहे....वेगळा विचार करतो व मांडतो ...वेगळा आचार पाळतो....." अशा व्यक्तीला पाण्यात पाहणे". 
येशू, गांधी,फुले,आगरकर या सारख्या महामानावना देखील या समूहाने छळले आहे.ज्यांचा जिवंतपणी तिरस्कार केला गेला आज कर्णोपकर्णी त्यांच्याच नामाचा जप सुरु आहे. ज्या आगरकरांची पुण्यातील सनातनी लोकांनी जिवंतपणी अंत्ययात्रा काढली होती आज तीच मंडळी आगरकरांच्या कार्यावर संशोधन करण्यात मग्न आहे.एकंदरीत परिस्थिती हि विसंगत आहे. जेव्हा ती मंडळी जिवंत होती तेव्हा त्यांना त्रास  दिला गेला यावर म्हणावेसे वाटते, " मेल्यावर हार टाकायचे होते  ....; .तर   जिवंतपणी काटे  दिले  कशाला ?"
उपरोक्त मंडळी हि आपल्या पेक्षा वेगळी आहे.....वेगळा दृष्टीकोन जोपासणारी आहे...आपला 'श्रुतीमृतीपुरानोक्त' अशा आचार-विचारांवर घणाघाती हल्ला चढविणारी  बंडखोर अशी आहे.म्हणून असूये ने ह्या सामाजिक विकृती ने असा छळवाद जोपासला.नंतर या समाजाला पाछाताप झाला पण त्यावेळी खूपच उशीर झालेला होता.शेवटी आज जी नाटके दिसतात ती केवळ प्रायश्चित्त म्हणून अस्तित्वात आलेली दिसतात.अलीकडे हि समाजात-व्यवस्थेत  सुधारणा घडवून आणण्यासाठी...जी-जी मंडळी जीव ओतून काम करते आहे .....प्रशासनातील  भ्रष्ट -नतद्रष्ट  प्रवृत्तीन विरुद्ध धाय मोकलून ओरडत आहे तरी त्यांच्या हाकेला 'ओ' देण्याची कुवत आपल्या समाजात उरलेली नसून.....'षंढ'  झाल्यागत....कर्णबधीर झाल्यागत तो निपचित पडलेला आहे.....कदाचित ते गेल्यावर त्यांचे हि पुतळे उभारले जातील....इतिहासात त्यांचा उल्लेख हि केला जाईल.....पण सध्या फक्त वनवास.......छळवाद आणि व्यर्थ  बकवास.....!
जिवंतपणी एखादी व्यक्ती पुढे जात असेल त्याच्या तंगड्या खेचणे हा जणू मानव समूहाचा स्वभाव धर्म बनू पाहत आहे. बादलीतील खेखड्यांच्या धर्मानुसार आम्हीही पाय खेचण्यात तसूभर हि कमी नाहीत हे क्षणो-क्षणी मानव समूह दाखवून देत असतो.या गुणांच्या बाबतीत....भाषा,प्रांत,वर्ण,धर्म इ. पलीकडे जाऊन पहिले तर खर्या अर्थाने एकवाक्यता दिसून येईल.....म्हणजेच राष्ट्रीय एकात्मतेचे हे महान उदाहरण देखील ठरू शकेल...यात शंका नाही.पाय ओढून आम्ही कोणाला 'वर' जाऊ देत नाही........आम्ही हि जात नाही.शेवटी एखादा कायमचा 'वर' गेला तरी चालेल, परंतु एखादा वर गेलेला, पदोन्नती झालेला, प्रगती-पथावर गेलेला आम्हाला मुळीच सहन होणार नाही. तो 'वर' गेला तर आम्ही त्याच्या वहाणांची 'पादुका' म्हणून जरूर पूजा करू....! शाळेत मुलीना शिकविण्यासाठी जाणार्या सावित्री बाई फुलेंवर चिखल फेक करणाऱ्या पुण्यातील मंडळी आज शिक्षण क्षेत्रात अग्रभागी आहे.
एकंदरीतच "कुत्र्याला गती....व मानवाला प्रगती " सहन होत नाही असे उपरोधाने म्हणावेसे वाटते. एखादी वेगाने जाणारी वस्तू.....वाहन...किंवा व्यक्ती पाहिली कि श्वान महाशयांच्या अंगात सारी ताकद एकवटली जाते त्या वेगोपासक घटकाच्या मागे ती भुंकत-भुंकत धाऊ लागते.सदरहू वेगवान घटक थांबला तर हि पाठलाग करणारी श्वान जमत हि शांत होते. आपला धावपट पुन्हा सुरु झाला कि ,पुन्हा श्वान राजाचा 'भूकपट  ' सुरु होतो. म्हणजे श्वान  मंडळीस गती ह्या साब्दाची अलर्जी आहे. आज सारे जग 'गती' साठी झटत आहे....प्रत्येकाला कोठे-न-कोठे गती हवी आहे....गतीविना मती व नीती चालत नाही....गतीविना राष्ट्र जगू शकत नाही..... त्याच गती बद्दल या श्वान महोदयांना का बरे एवढे वावडे असेल?
कोणत्याही गतीचा वेग सहन न होणे हा श्वान धर्म आहे तसाच एखाद्याची 'प्रगती' सहन न होणे हा मनुष्य धर्म मानावाच लागेल. मग ती प्रगती आर्थिक -राजकीय -वैचारिक असो कि, सामाजिक असो....माणूस नावाचा प्राणी ती डोळ्यात खुपवून घेईलच.
इतिहासात हि तसे दाखले आहेतच......पृथ्वीराजाचा काटा काढण्या साठी जयचंद परक्या "घोरी" ला निमंत्रण देतोच......पौरसा चा पराक्रम पाहवत नाही म्हणून एखादा अंभी सिकंदराला सहाय्य करतोच .......राणाप्रताप एकटा स्वतंत्र आहे म्हणून मानसिंग अकबराच्या छत्रछायेखाली आक्रमण करतोच.छ.शिवाजी राजे हि आधी स्वकियांशीच लढलेत. आज हि आम्हाला परकीय शत्रू ऐवजी स्वकीय शत्रूंचे जास्त भय आहे.
तात्पर्य: एखादी व्यक्ती अथवा संस्था किती हि चांगले ध्येय घेऊन वाटचाल करीत असेल तरी हि त्यांच्या मागे शान प्रवृत्ती चे शुक्लकाष्ठ लागेल च यात शंका नाही....!
(c) -----जयपालसिंह विक्रमसिंह गिरासे
९४२२७८८७४० ,शिरपूर ,जि-धुळे [महाराष्ट्र]