चोपडा, दि. 30 सप्टेंबर : महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालय, चोपडा यांच्यातर्फे दत्तक गाव योजनेअंतर्गत वेले-आखतवाडे (ता. चोपडा) येथे सोमवार, दि. 28 सप्टेंबर 2026 रोजी “दुग्ध व्यवसाय: ग्रामीण उद्योजकतेची नवी दिशा” या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले. गावकरी, विशेषतः महिलांसाठी आयोजित या कार्यक्रमाला गावातील नागरिकांनी, विशेषतः महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. सदर कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष ॲड. संदीप पाटील, सचिव डॉ. स्मिता पाटील तसेच महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. भारतकुमार सपकाळ हे होते, प्रमुख अतिथी म्हणून वेले-आखतवाडे गावातील ज्येष्ठ नागरिक व महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे नियामक मंडळ सदस्य श्री. छगन पाटील उपस्थित होते.
दत्तक गाव योजनेचे समन्वयक तथा महाविद्यालयाचे इंग्रजी विभागप्रमुख डॉ. दीनानाथ पाटील यांनी प्रास्ताविकातून योजनेची भूमिका व कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. सहसमन्वयक सहा. प्रा. निरंजन पाटील यांनी सूत्रसंचालन केले.
जळगाव येथील KITE फोरम चे व्यवस्थापकीय संचालक श्री. सागर पाटील आणि संचालक श्रीमती हृतिगंधा देशमुख यांनी प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थितांना मार्गदर्शन केले. ग्रामीण भागात दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून रोजगारनिर्मिती व आर्थिक स्वावलंबनाच्या संधी कशा उपलब्ध होऊ शकतात, यावर त्यांनी प्रकाश टाकला. शासनाच्या विविध योजना, विशेषतः पशुधन योजनांची तसेच बायफ (BAIF) या सेवाभावी संस्थेमार्फत राबविल्या जाणाऱ्या कृत्रिम रेतन योजनेची सविस्तर माहिती त्यांनी दिली. कृत्रिम रेतनाच्या माध्यमातून पशुधनाचे संकर करून दुग्ध उत्पादनात वाढ करता येते, याकडे त्यांनी लक्ष वेधले. वेले-आखतवाडे गावातील सद्यस्थितीतील पशुधनाचा आढावा घेऊन गावातील दुग्ध व्यवसायाच्या वाढीच्या शक्यतांवरही चर्चा करण्यात आली. महिलांनी स्वयंरोजगार कसा मिळवावा, याबाबतही त्यांनी मौलिक मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी समितीचे (IQAC) समन्वयक डॉ. लालचंद पटले, शारीरिक शिक्षण संचालिका डॉ. सौ. क्रांती क्षीरसागर, भौतिकशास्त्र विभागप्रमुख प्रा. सौ. प्रीती रावतोळे, करिअर कट्टा समन्वयक तथा सहा. प्रा. योगेश पाटील यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या शेवटी सहा. प्रा. श्री. योगेश पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले.
ग्रामीण महिलांना उद्योजकतेकडे वळवून त्यांना स्वयंपूर्ण बनविण्याच्या दृष्टीने हा उपक्रम उपयुक्त ठरला, अशी भावना उपस्थित ग्रामस्थांनी व्यक्त केली.

0 Comments