Advertisement


राज्यातील सर्वोत्कृष्ट संघ म्हणून सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधिश श्री .अभय ओक यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारतांना चोपडा ज्येष्ठ नागरिक संघ - अध्यक्ष व पदाधिकारी

 चोपडा ज्येष्ठ नागरिक संघास यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई चा ‘सर्वोत्कृष्ट संघ’ पुरस्कार... !

ज्येष्ठांच्या सेवाभावी वाटचालीचा राज्यस्तरावर गौरव

प्रतिनिधी । चोपडा

ज्येष्ठ नागरिकांच्या विविध सामाजिक, आरोग्यविषयक व सेवाभावी उपक्रमांत सातत्याने योगदान देणाऱ्या चोपडा ज्येष्ठ नागरिक संघास यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई यांच्या वतीने आयोजित ‘ज्येष्ठ नागरिक राज्यस्तरीय कृतज्ञता सन्मान सोहळा – वर्ष २७ वे’ या सोहळ्यात राज्यातील सर्वोत्कृष्ट संघ म्हणून सन्मानित करण्यात आले.

    मुंबई येथे झालेल्या या सोहळ्यात सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती मा. अभय ओक प्रमुख अतिथी म्हणून, तर सोहळ्याचे अध्यक्ष माजी विधानसभा अध्यक्ष मा. अरुणभाई गुजराथी यांच्या प्रमुख उपस्थितीत चोपडा ज्येष्ठ नागरिक संघाच्या प्रतिनिधींनी हा मानाचा पुरस्कार स्वीकारला.

चोपडा ज्येष्ठ नागरिक संघाने यापूर्वीही आपल्या कार्याची उल्लेखनीय छाप उमटविली आहे. जिल्हास्तरीय सर्वोत्कृष्ट संघाचा सन्मान, विभागस्तरावरील पूरग्रस्त मदतनिधी संकलनात प्रथम क्रमांक तसेच फेस्कॉमच्या माध्यमातून ग्रामीण भागातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल मिळालेला गौरव, अशा विविध सन्मानांनी संघाच्या कार्याची दखल घेण्यात आली आहे.

संघाच्या पूर्वसूरींपासून आजच्या विद्यमान कार्यकारिणीपर्यंत ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध कार्यक्रम, आरोग्य तपासणी व आरोग्यविषयक शिबिरे, सामाजिक उपक्रम आणि जनजागृतीपर कार्यक्रम सातत्याने राबविण्यात आले आहेत. या प्रदीर्घ सेवाभावी वाटचालीला भौतिक सुविधांचीही जोड मिळाली आहे.

आमदार सौ. लता सोनवणे यांच्या आमदार निधीतून संघ कार्यालय व आवारातील पेव्हर ब्लॉक, दानशूर व्यक्तींच्या सहकार्यातून सर्व सुविधायुक्त संघ भवन, नगरपालिकेच्या माध्यमातून खुली व्यायामशाळा, वर्तमानपत्र वाचन कट्टा, तसेच सभासद निधीतून संरक्षक भिंत व मुख्य प्रवेशद्वार अशा विविध सुविधा संघाच्या कार्याला बळ देणाऱ्या ठरल्या आहेत.

ज्येष्ठ नागरिकांच्या सक्रिय सहभागातून उभ्या राहिलेल्या या सेवाभावी चळवळीचा राज्यस्तरीय सर्वोच्च सन्मानाने झालेला गौरव हा संघाच्या कार्याचा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

पुरस्कार स्वीकारण्यासाठी संघाचे अध्यक्ष श्री. जयदेव नाना देशमुख, माजी अध्यक्ष श्री. व्ही. एच. करोडपती, उपाध्यक्ष श्री. जिजाबराव नेरपगारे, सचिव विलाससर


खेडीभोकरीकर, कोषाध्यक्ष श्री. भालचंद्र विठ्ठलराव साळुंखे, स्वीकृत सदस्य प्रा. एस. एम. पाटील, श्री. गोकुळ वामन पाटील, श्री. परशुराम पेंढारकर, सौ. राधाताई देशमुख, सौ. निर्मलाताई रमेश चौधरी, श्री. रमेश व्ही. चौधरी व श्री. धर्मा मराठे उपस्थित होते.

“हा सन्मान केवळ पदाधिकारी किंवा एखाद्या व्यक्तीचा नसून, चोपडा ज्येष्ठ नागरिक संघाच्या सामूहिक सेवाभावाचा आहे. चोपड्यातील ज्येष्ठ नागरिकांनी वर्षानुवर्षे जपलेल्या सामाजिक बांधिलकीला आणि संघाच्या सामूहिक प्रयत्नांना मिळालेला हा मानाचा मुजरा आहे,” अशी भावना संघाध्यक्ष जयदेव देशमुख व सचिव विलाससर खेडीभोकरीकर यांनी व्यक्त केली.

चोपडा ज्येष्ठ नागरिक संघाच्या दीर्घ सेवाभावी वाटचालीला मिळालेला हा राज्यस्तरीय सन्मान म्हणजे चोपड्याच्या ज्येष्ठांच्या कार्याचा आणि सामाजिक संस्कारांचा गौरव असल्याची भावना व्यक्त होत आहे.

Post a Comment

0 Comments