Advertisement


सोशल मीडिया, व्यसन व मुलींच्या अपहरणाबाबत जनजागृती मोहीम


लोकसेवा आयुर्वेदिक नशामुक्ती केंद्राच्या पुढाकारातून ५ ऑक्टोबरपासून अभियान

साखरखेर्डा प्रतिनिधी : आदिवासी क्रांती मराठी न्यूज 

साखरखेर्डा : मोबाईल व सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे विद्यार्थ्यांवर होणारे सकारात्मक परिणाम जसे आहेत, तसेच त्याचे दुष्परिणामही मोठ्या प्रमाणात समोर येत आहेत. सोशल मीडिया, प्रेमप्रकरणे, ऑनलाइन फसवणूक तसेच व्यसनांच्या आहारी जाणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी लोकसेवा आयुर्वेदिक नशामुक्ती केंद्र, साखरखेर्डाचे संचालक राधेश्याम बंगाळे यांच्या संकल्पनेतून विशेष जनजागृती अभियान राबविण्यात येणार आहे.


महाविद्यालयीन तरुण-तरुणी तसेच शालेय विद्यार्थ्यांमध्ये सोशल मीडियाचा वाढता वापर चिंतेचा विषय बनला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून निर्माण होणाऱ्या प्रेमसंबंधांमुळे काही मुली आई-वडिलांना न सांगता घरातून निघून जाण्याच्या घटना घडत आहेत. अशा घटनांमध्ये फसवणूक होण्याची शक्यताही वाढत असल्याने विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळणे आवश्यक आहे.
त्याचबरोबर सोशल मीडिया व ऑनलाइन माध्यमातून अमली पदार्थांची विक्री तसेच त्यासंदर्भातील लिंक फिरत असल्याच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना व्यसनांपासून दूर ठेवण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज निर्माण झाली आहे. गांजा, तंबाखू व इतर मादक पदार्थांच्या आहारी जाणाऱ्या तरुणांचे प्रमाण रोखण्यासाठी जनजागृतीवर भर देण्यात येणार आहे.
याच उद्देशाने दि. ५ ऑक्टोबर २०२६ पासून ‘नशामुक्ती व सोशल मीडिया जनजागृती अभियान’ राबविण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना व्यसनांचे दुष्परिणाम, सोशल मीडियाचा अतिरेक कसा टाळावा, ऑनलाइन माध्यमांचा सुरक्षित वापर कसा करावा तसेच चुकीच्या ऑनलाइन संपर्कापासून स्वतःचे संरक्षण कसे करावे, याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
या अभियानाच्या आयोजनासाठी लोकसेवा आयुर्वेदिक नशामुक्ती केंद्राचे संचालक राधेश्याम बंगाळे यांनी साखरखेर्डा पोलीस स्टेशनचे ठाणेदार युवराज रबडे यांना निवेदन देऊन सहकार्याची विनंती केली आहे. तसेच मुख्याध्यापक ठाकूर सर, कुले सर व भावसार सर यांची भेट घेऊन शाळा-महाविद्यालयांमध्ये जनजागृती मोहीम राबविण्यासाठी सहकार्य करण्याची विनंती करण्यात आली.
या अभियानात साखरखेर्डा पोलीस स्टेशनचे ठाणेदार युवराज रबडे हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून विद्यार्थ्यांशी संवाद साधणार असून, विद्यार्थ्यांना व्यसनमुक्ती, सोशल मीडिया वापरातील खबरदारी आणि सुरक्षिततेबाबत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले जाणार आहे.
विद्यार्थ्यांनी सोशल मीडिया व आधुनिक तंत्रज्ञानाचा सकारात्मक वापर करावा, व्यसनांपासून दूर राहावे आणि कोणत्याही संशयास्पद ऑनलाइन संपर्काला बळी पडू नये, हा संदेश या अभियानाच्या माध्यमातून देण्यात येणार आहे.

Post a Comment

0 Comments