लेट लतीफ शिक्षकांना बसणार चाप; दांडीबहाद्दरांवर कारवाईचे स्पष्ट संकेत!
चोपडा, दि. २४ ऑगस्ट २०२६ : शाळांमध्ये शिक्षकांची शंभर टक्के उपस्थिती, वेळेचे काटेकोर पालन आणि विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, यासाठी चोपडा पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने आता ‘सरप्राईज शाळाभेट’ मोहीम अधिक प्रभावीपणे राबविण्यास सुरुवात केली आहे.
प्राथमिक शिक्षणाधिकारी निलेश पाटील यांच्या आदेशान्वये दि. २४ ऑगस्ट २०२६ रोजी तालुक्यातील विविध शाळांना अचानक भेटी देऊन शाळांच्या कामकाजाची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. *यात शिक्षणाधिकारी निलेश पाटील यांनी सुटीवर असताना स्वतः देखील सकाळी 6.40 वाजता शाळा भेट दिली.*
या मोहिमेत गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, विषयतज्ज्ञ तसेच विशेष शिक्षक यांनी सहभागी होत विविध शाळांना अचानक भेटी दिल्या. पूर्वसूचना न देता करण्यात आलेल्या या पाहणीमुळे शाळेतील प्रत्यक्ष परिस्थिती समोर आली. विशेषतः शिक्षकांची उपस्थिती, शाळेत येण्याची वेळ, अध्यापनाचे नियोजन आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा बारकाईने आढावा घेण्यात आला.
उशिरा येणाऱ्या शिक्षकांना नोटीस
शाळेच्या निर्धारित वेळेचे पालन न करता उशिरा शाळेत दाखल होणाऱ्या शिक्षकांची गंभीर दखल घेण्यात आली. अशा शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आली असून, भविष्यात वेळेचे पालन न केल्यास नियमानुसार शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.
शिक्षकांनी शाळेच्या वेळेबाबत कोणतीही हलगर्जीपणा करू नये. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताशी तडजोड करणारी निष्काळजी वृत्ती कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतली जाणार नाही, अशी प्रशासनाची कठोर भूमिका असल्याचे या मोहिमेतून स्पष्ट झाले आहे.
दांडीबहाद्दर शिक्षकांवर कारवाई
वारंवार विनापरवानगी गैरहजर राहणारे तसेच शाळेच्या कर्तव्यामध्ये कसूर करणाऱ्या शिक्षकांचीही गंभीर दखल घेण्यात आली. विनापरवानगी अनुपस्थिती अथवा कर्तव्यात कसूर आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कठोर कार्यवाही करण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत.
विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला सर्वोच्च प्राधान्य
शाळा भेटीदरम्यान विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता, अध्ययन-अध्यापन प्रक्रिया, विद्यार्थ्यांची उपस्थिती, शैक्षणिक प्रगती आणि उपलब्ध शैक्षणिक साधनांचा वापर यांची पाहणी करण्यात आली. विद्यार्थ्यांना केवळ पाठ्यपुस्तकी ज्ञान न देता गुणवत्तापूर्ण व परिणामकारक शिक्षण मिळते आहे का, याचीही तपासणी करण्यात आली.
यासोबतच शाळा परिसराची स्वच्छता, स्वच्छ पिण्याचे पाणी, शालेय पोषण आहाराची गुणवत्ता व नियमितता, विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या विविध शासकीय योजनांचे लाभ यांचाही सविस्तर आढावा घेण्यात आला.
शिक्षण विभागाच्या या धडक मोहिमेमुळे शाळांमध्ये शिस्त, वेळेचे पालन आणि जबाबदारीची भावना अधिक दृढ होण्यास मदत होणार आहे. ‘कर्तव्यात कसूर करणाऱ्यांची गय नाही आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेशी तडजोड नाही’ हा स्पष्ट संदेश या सरप्राईज शाळाभेट मोहिमेतून देण्यात आला आहे.

0 Comments